⋄ संत सेवालाल महाराज यांचे विचारधन
© प्रा. डॉ. सुभाष राठोड, पुणे
१५ फेब्रुवारी - २०२४ जयंती विशेष..
सत्य, सेवाभाव व त्याग अशी मानवतावादी शिकवण देणारे, भक्ती व परमार्थाच्या मार्गाने समाजात जागृती निर्माण करणारे बंजारा समाजाचे श्रद्धास्थान संत सेवालाल महाराज यांची १५ फेब्रुवारी रोजी जयंती साजरी करण्यात येते. जयंतीदिनी संत सेवालाल महाराज यांना शत शत प्रणाम !
15 फेब्रुवारीला संत सेवालाल महाराज यांची जयंती सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, शाळा – महाविद्यालयात साजरी करण्याबाबतचे परिपत्रक महाराष्ट्र शासनाने 2018 मध्ये काढलेले आहे. आज संत सेवालाल महाराजांची जयंती. त्यानिमित्ताने समाजसुधारक संत सेवालाल महाराज यांच्या विचारधनावर टाकलेला एक संक्षिप्त दृष्टिक्षेप..
आपल्या महाराष्ट्राला संतांची पुरातन अशी परंपरा आहे. महाराष्ट्राच्या मातीला जसा पराक्रमाचा वारसा आहे तसा संतांच्या विचारांचा गंधही आहे. महाराष्ट्र भूमीत अनेक जाती-धर्मातील साधुसंत, प्रबोधनकार, कीर्तनकारांनी जन्म घेतला. महाराष्ट्राची जडणघडणच मुळी संतांच्या विचारातून झालेली आहे. त्यांच्या शिकवणुकीमुळेच आज संपूर्ण समाज गुण्यागोविंदाने नांदतो आहे. संत आयुष्यभर सर्वांना परमार्थाचा मार्ग दाखवितात. संत साहित्याचा खरा आत्मा भक्तीबरोबरच समाजप्रबोधन, समाजकल्याण हा आहे. संत परंपरेतील सर्वच संतांनी आपल्या साहित्यातून विश्वकल्याणासाठी परमेश्वराकडे साकडे घातले आहे. ‘अवघे विश्वची व्हावे सुखी’, ‘जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती। देह कष्ट्विती, परोपकारे॥‘ ही संतांची खरी भूमिका आहे. समाजातील वाईट चालीरिती, अज्ञान, कुप्रथा, जातीभेद नष्ट करण्याचे महत्कार्य संत मंडळींनी केले. संतांची ही शिकवण आजही आपल्याला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरत आहे. संतांच्या विचाराचा प्रचार-प्रसार करण्याची गरज आजच्या विज्ञान – तंत्रज्ञानाच्या युगातही आहे
संत, महापुरुष, सद्पुरुष, थोर व्यक्ती हे एखाद्या विशिष्ट जातीत जन्माला येत असले तरी त्यांचे कार्य एका विशिष्ट जाती-समूहापुरते मर्यादित कधीच नसते. संतांचा प्रत्येक श्वास सृष्टीतल्या प्रत्येक जीवासाठी समर्पित असतो. समाजाला सद्मार्गाकडे घेऊन जाण्याचे द्रष्टेपणाचे कार्य संतमंडळी करीत असतात. असेच बंजारा समाजातील एक थोर संत म्हणजे संत सेवालाल महाराज.
संत सेवालाल महाराज यांचा जन्म बंजारा समाजात माघ कृष्ण पक्ष शके 1661, दि. 15 फेब्रुवारी 1739 रोजी आंध्र प्रदेशातील गोलालडोडी ता. गुत्ती जि. अनंतपूर येथील एका सधन पशुपालक व व्यापारी कुटुंबात झाला. आता ‘गोलालडोडी’ हे गाव ‘सेवागड' या नावाने ओळखले जाते. काही जाणकारांच्या मते संत सेवालाल महाराज यांचा जन्म कर्नाटक राज्यातील ‘स्वर्णकोप्पा' येथे झाला असावा असाही एक मतप्रवाह आहे. महाराजांच्या वडिलांचे नाव भीमानाईक, तर आईचे नाव धरमंणी होते. महाराजांचे वडील भीमा नाईक हे तांड्याचे नाईक होते म्हणून त्यांना ‘भीमा नाईक' असे म्हणत असत. भीमा नाईक यांना पाच मुले होती. संत सेवालाल महाराज हे वयाने सर्वात ज्येष्ठ होते. सेवादास, सेवाभाया अशीही त्यांची नावे प्रचलित आहेत. देशातील विविध राज्यांत आज महाराजांची हजारों मंदिरे मोठ्या श्रध्देने उभारल्यात आलेली आहेत.
फिरस्त्या व्यापाराच्या निमित्ताने भारतभर भ्रमंती करीत असताना संत सेवालाल महाराजांना भारतातील अनेक संतांच्या कार्याविषयी माहिती मिळाली. संतांच्या या प्रेरणेतून सत्याचा शोध घेऊन आपल्या समाजाला संत सेवालाल महाराज यांनी जीवन जगण्याचा खरा मार्ग दाखविला. हजारो वर्षांपासून अज्ञानाच्या अंधारात खितपत पडलेल्या, बैलांच्या पाठीवर माल लादून ‘लदेणी’ चा व्यवसाय, व्यापार करणाऱ्या गोर - बंजारा समाजाला त्यांनी आपल्या अमृतवाणीतून जीवन जगण्याचा खरा मार्ग दाखविला. बोलवचने, दोहे, लढी रचना, भजने इत्यादींच्या माध्यमातून त्यांनी बंजारा’ समाजात सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक परिवर्तन घडवून आणले. संत सेवालाल महाराजांचा एक संत म्हणून विचार करताना त्यांचे विचार भारतीय संत परंपरेतील भगवान महावीर, तथागत गौतम बुद्ध, संत कबीर, संत बसवेश्वर, संत तुकाराम, संत तुकडोजी महाराज, संत गाडगेमहाराज इत्यादींच्या विचारांशी जुळणारे आहेत. परंतु त्यांचे विचार बंजारा बोलीभाषेत असल्याने, लिखित स्वरूपात समाजासमोर अलीकडच्या काळात आल्याने जगाला त्यांच्या महान विचारांची ओळख थोडी उशीराच झाली असे म्हणावे लागेल.
संत सेवालाल महाराज यांचे विचार मानवतावाद व विज्ञानवाद यांची शिकवण देणारे आहेत. समाजातील भोळ्या समजुती, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, पशूबळी प्रथा, अनीतीचे व्यवहार, भूतदया, निसर्गप्रेम, स्व-कर्तृत्वावर विश्वास, सत्य, अहिंसा व प्रेम इत्यादीं यांची शिकवण देणारे आहेत. त्यांचे महनीय विचार बोलवचने, दोहे, कवणे व भजने या रूपात प्रकट झालेले आहेत. त्यांच्या विचारांचा थोडक्यात परामर्श…
● सत्य हाच खरा धर्म :-
सत्य हाच खरा धर्म आहे, नेहमी सत्याचे आचरण करावे, असा संदेश महाराजांनी आपल्या दोह्यातून समाजाला दिलेला आहे. सत्य जाणणे यातच खरे जीवनाचे सार आहे, हे सांगताना संत सेवालाल महाराज बंजारा बोलीत निरूपण करतात…
‘सत्यधर्म लीनताती रेंणू ।
सदा सासी बोलंणू ।
हर वातेनं सोच समजन केवंणू ।
भवसागर पार कर लेंणू ।।‘
● विश्वबंधुत्वाचा संदेश देणारे सेवालाल महाराज :-
अहिंसा म्हणजे केवळ कोणाची हत्या न करणे एवढेच नसून काया, वाचा आणि मनाने कोणालाही न दुखवणे होय. देवी ही सर्वांची आई आहे, ती कधीच आपल्या मुला - बाळावर कोपत नाही. दुःख, पिडा, त्रास देत नाही. तिला प्रसन्न करण्यासाठी कोंबड्या-बकऱ्याचा बळी देण्यापेक्षा साध्या पध्दतीने शिऱ्याचा नैवेद्य देऊन प्रसन्न करा. असा साधा-सोपा ईश्वर भक्तीचा मार्ग संत सेवालाल महाराज सांगतात. पुढील ' आरदास’ नामक रचनेतून महाराज अवघे विश्वचि व्हावे सुखी अशी विश्वकल्याणाची प्रार्थना करतात.
‘वाडी-वस्तीनं सायी वेस।
किडी-मुंगीनं सायी वेस।
जीव-जणगाणीनं सायी वेस।
बाल-बच्चानं सायी वेस।
सेनं सायी वेस।।‘
भावार्थ - हे देवीमाते या सृष्टीतील सर्व प्राणिमात्रांचे रक्षण कर. वाडी-वस्त्या, गुरा-ढोरांचे, पशूपक्षांचे एवढेच नव्हे तर किड्या-मुंग्यांचे सुद्धा रक्षण कर, सर्वांचे रक्षण कर !
● स्व-कर्तृत्वावर विश्वास ठेवा :-
सर्वसामान्य माणसाला जीवन जगण्याचे सूत्रच जणू सेवालाल महाराज पुढील दोह्यातून सांगतात.
‘तम सौता तमारे जीवनमं दीवो लगा सको छो।
कोई केनी भजो-पूजों मत ।
कोई केती कमी छेनी।
सौतर वळख सौता करलीजो।
भजे-पूजेमं वेळ घालो मत ।
करंणी करेर शिको,
नरेर नारायण बंन जायो।
जाणजो…! छाणजो…! पछच मानजो…!!
भावार्थ – प्रत्येक व्यक्तीत उपजतच काही शक्ती, उर्जा, सामर्थ्य, बलस्थाने, गुणवत्ता व योग्यता असतेच. त्यासाठी सर्व प्रथम आपला स्वतःवर विश्वास असला पाहिजे. तुम्ही स्वतःच तुमच्या जीवनात दिवा लावू शकता कोणीही कोणाला भजू – पुजू नका. तुम्ही स्वतःचे जीवन स्वयं प्रकाशमान करू शकता. दैववादी राहू नका तर प्रयत्नवादी व्हा. कोणीतरी येईल आणि माझे भले करील या भ्रमात राहू नका. माझ्याने हे होणारच नाही असा न्यूनगंड कोणीही मनात बाळगू नये. कोणाचीही अवास्तव स्तुती करु नका. स्वतः:ला कधीही कमी लेखू नका, भजन – पूजन यात वेळ घालवण्यापेक्षा कर्तव्यनिष्ठ बना. कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा. योग्य – आयोग्याचा सारासार विचार करुन मगच निर्णय घ्या. डोळस व्हा. चिकीत्सा करून स्वतः अनुभव घ्या. कोणीतरी सांगितले म्हणून नाही तर मला योग्य वाटते म्हणून कोणतीही कृती, विचार व मताचा स्विकार करा. व्यक्तिस्वातंत्र्य व बृद्धीप्रामाण्यवादाला संत सेवालाल महाराज किती महत्त्व देताना दिसतात हेच वरील दोह्यातून स्पष्ट होते.
● कपटनीतीचा व्यवहार करून लोकांना फसवू नका :-
छल, कपट, बेईमानी करणाऱ्यांवर फटकारे ओढताना संत सेवालाल महाराज म्हणतात -
'जे कपट वाचा लेन आये ।
पाप ओरे सोबत जाये ।
यम घरेरो फासो ओरे गळेमं पडीये ।
नव मणेरी काया ओरी नरकेम मळजाये ।
लक्ष चौऱ्यांशी योनी भोगाये ।।
भावार्थ : कपटनीतीचा व्यवहार करून जे लोकांना फसवतील ते पापाचे भागीदार बनून नरकात जातील. चौऱ्यांशी लक्ष योनीत पापी बनून भटकत राहतील. म्हणून कोणीही कपटनीतीचा, बेईमानीचा व्यवहार करू नये असे ते सांगतात. चोर, लुटारू, भ्रष्टाचारी माणसे समाजात असतील तर समाजात अशांतता पसरते, अराजकता माजते. लोकांना दुःख भोगावे लागते. त्यासाठी समाजात मेहनती, नीतीवान व चारित्र्यसंपन्न लोकांचीच गरज असते. सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी विषमतावादी व्यवस्थेवर प्रहार करताना सेवालाल महाराज म्हणतात –
‘गोर-गरीबेनं दांडन खाये !
ओर सात पिढी नरकेमं जाये !’
भावार्थ – जो कोणी गोर-गरिबांना फसविल, लुबाडून खाईल, त्यांच्यावर अन्याय – अत्याचार करील त्याच्या सात पिढ्या नरकात जातील, म्हणजेच त्याचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही.
● नीतिमत्तेचे पालन करा, निर्व्यसनी बना :-
वाईट चालीरिती, रुढी, परंपरा, अंधश्रद्धा व व्यसनात गुरफटलेल्या समाजाला जागृत करण्यासाठी मार्गदर्शन करताना महाराज म्हणतात –
‘सणो – सामंळो गोरभाई ।
चोरी मत करजो कोई,
लाज रखाडो धर्मेरी ।
मत लो जीव, काढो मत लोही !
दारु मत पिवो कोई ।
धर्मेरी बाणी रखाडो भाई !
भडकेजावो लांबी झाडी ।
कोई मत बोलजो लुच्ची लबाडी,
केसूला नहीं मोरियो आजी ।
करजो मत कोई रंडीबाजी !’
भावार्थ – ऐका माझ्या बंधुंनो, कोणीही चोरी करु नका, धर्माची लाज राखा. हिंसा करू नका. दारुसारख्या व्यसनाच्या आहारी जाऊ नका. निर्व्यसनी बना. लुच्ची – लबाडी, खोटारडेपणा करून कोणाचीही फसवणूक करू नका. अर्थार्जनासाठी दूर जावे लागले तरी जा. चांगल्यांच्या संगतीत राहा, ख-या कामाला यशस्वी करा. कोणीही रंडीबाजी करु नका म्हणजे बाहेरख्यालीपणा अनैतिक संबंधापासून दूर राहा. अन्यथा तुम्ही वणवण भटकल्याशिवाय राहणार नाहीत. मी दिलेली शिकवण जर तुम्ही आचरणात आणली तर पळस ज्याप्रमाणे ग्रीष्म ऋतूत उन्हातही फुलतो, बहरून स्वतःकडे सर्वांना आकर्षित करतो, त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा बहरून जाल, म्हणजेच तुमचा उत्कर्ष होईल !
● कोणावरही विसंबून राहू नका :-
माणसाने आपल्या जीवनात स्वावलंबी बनले पाहिजे. ‘जो दुसऱ्यावर विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला ! या उक्तीप्रमाणे व्यक्तीने अन्य व्यक्तीवर विसंबून राहू नये याविषयी संत सेवालाल महाराज म्हणतात –
‘केरी भरोसेप मत बेसो, पंण दुसरेंर भरोसेर बंनो ।
कोई केरी वाट चालेनी, सोताच सोतार वाट चालो ॥‘
भावार्थ – कोणाच्याही भरोशावर विसंबून राहू नका. परंतु अन्य व्यक्तींच्या भरोशाचे बना. कोणीही कोणाची वाट चालत नाही, स्वतःलाच स्वतःची वाट चालावी लागते अर्थात स्वतःलाच आपले सर्व करावे लागते. अंधानुकरण, इतरांची वाट चालण्यापेक्षा स्वतःची वाट, मार्ग निर्माण करण्याचा दिव्य संदेश संत सेवालाल महाराजांनी बंजारा समाजाला दिला आहे.
● अंधश्रद्धेवर कडाडून हल्ला :-
अंधश्रद्धेवर कडाडून टीका करताना सेवालाल महाराज म्हणतात –
‘कोई केनी भजो - पुजो मत,
भजे - पुजेमं वेळ घालेपेक्षा करणी करेर शिको !’
भावार्थ :- पूजा – अर्चा, जप – जाप्य, नवस – सायास, व्रत – वैकल्ये यात गुंतून राहण्यापेक्षा असे काहीतरी सत्कर्म करा की, ज्यातून तुमची कीर्ती वाढेल, प्रशंसा होईल.
● संत सेवालाल महाराज यांनी सांगितलेला मानवता धर्म :
सारी माणसे ही एकाच ईश्वराची लेकरे आहेत, असे आपल्या थोर साधुसंतांनी सांगितले आहे. पण तरीही आपण सतत आपापसांत झगडत असतो. माणसांमधील या संघर्षाला कधी धर्म कारणीभूत ठरत असतो, तर कधी धन; कधी जात, तर कधी भाषा. आपल्यातील काही लोकांना कमी दर्जाचे मानून स्वार्थी धर्ममार्तंडांनी त्यांना हजारो वर्षे आपल्यापासून दूर ठेवले. त्यांची सावलीदेखील अपवित्र, अपशकुनी मानली. त्यांना गावकुसाबाहेर ठेवले. ज्यांच्यावर अन्याय होतो तीदेखील माणसेच आणि अन्याय करणारीही माणसेच ! केवढा हा दैवदुर्विलास ! ज्या थोर महात्म्यांनी हे विदारक सत्य जाणले, त्यांनी विषमतेची ही दरी बुजवण्याचा अथक प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी सर्वांना मानवधर्माची साद घातली. संत सेवालाल महाराजांनी सुद्धा मानवता हाच खरा धर्म आहे, हे पुढील दोह्यातून सांगितले आहे.
‘भूकेन बाटी खराणू,
तरसेनं पाणी पराणू,
भूलाडी पडगे जेन वाट वताणू,
आसरो मांगेवाळेनं सहारो देणू,
इ गोरुरो धरम छ !
संत सेवालाल महाराज आपल्या दोह्यांच्या माध्यमातून निरुपण करताना सांगतात की, भूकेल्यांना अन्नदान करावे, तहानलेल्यांना पाणी द्यावे. वाट चुकलेल्यांना रस्ता दाखवावा. निराधार, निराश्रित लोकांना आसरा, सहारा द्यावा. हाच खरा मानवतावादी धर्म संत सेवालाल महाराज यांनी सांगितलेला आहे.
संत सेवालाल महाराज यांचे असे कितीतरी दोहे, कवणे, बोलवचने गोर – बंजारा’ बोलीभाषेत प्रचलित आहेत. येथे काही निवडक दोह्यांचाच परिचय करून दिला आहे.
संत सेवालाल महाराजांनी अत्यंत रसाळ, प्रभावी व संवेदनशील अशी सत्यवचने, दोहे सांगून समाजाला सन्मार्गाची जाणीव करून दिली आहे. संत सेवालाल महाराज निरक्षर असूनही त्यांनी समाजाला बुद्धिप्रामाण्यवादाचे, इहवादाचे आणि विज्ञानवादाचे धडे दिलेले आहेत. त्यांची वचने, दोहे, कवणे ही साध्या, सोप्या, सरळ व रसाळ अशा बंजारा बोलीतील आहेत. संत सेवालाल महाराजांचे हे क्रांतिकारी, महनीय विचार केवळ बंजारा बोलीभाषेपुरते मर्यादित न राहता अन्य भाषेतूनही प्रकट व्हावेत ही अपेक्षा ! संत सेवालाल महाराज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन !
⋄ प्रा. डॉ. सुभाष राठोड, पुणे
कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक, रयत शिक्षण संस्थेचे, वसंतराव सखाराम सणस ज्युनिअर कॉलेज, वडगाव खूर्द, पुणे - ४१
Share
संत सेवालाल महाराज यांच्यावरील उत्कृष्ट व दर्जेदार लेख
ReplyDelete